Join WhatsApp group

निबंध-चित्रकलेतून उमलली सृजनशीलता : शिक्षक दिनी पोलिसांचा आगळा-वेगळा उपक्रम

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : राज्य गणेश महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पणाने झाली.

विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक बांधवांचे ठाणेदार अजित जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.इयत्ता पाचवी ते बारावी या गटांमधील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत पोलीस दलाचे समाजातील स्थान, गणेशोत्सवातील शिस्तबद्धता तसेच शिक्षकांचे योगदान यांसारख्या विषयांवर आपली दृष्टी मांडली.

चित्रकलेतूनही विद्यार्थ्यांची सृजनशीलता आणि सामाजिक भान रंगून दिसले.स्पर्धेचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून तर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमाला ठाणेदार अजीत जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याबरोबरच त्यांच्या मनात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

या उपक्रमामुळे विद्यार्थी व पोलीस दल यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, शालेय जीवनात सामाजिक जाणिवा विकसित करण्यासाठी पोलिसांकडून उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव लवकरच विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बांधव व पोलिस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!