Join WhatsApp group

प्रशांत हजारी यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक किट व ‘सुपर 50’ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपNMMS मोफत मार्गदर्शन वर्गाची सुरूवात; आमदार हरीश पिंपळे यांची उपस्थिती

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर |गजानन महाराज बहुद्देशीय संस्था व प्रकाशवाट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेसाठी ‘सुपर 50’ नावाने मोफत मार्गदर्शन वर्गांची आज (२६ जुलै) सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. या वेळी निवडलेल्या ५५ विद्यार्थ्यांनी पालकांसह पावसातही वेळेवर उपस्थिती लावून कार्यक्रमाची शिस्त दाखवली.

शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना परीक्षा, अभ्यासपद्धती व वर्गातील नियमांचे मार्गदर्शन देण्यात आले. पहिल्या तासाला NMMS साठी विज्ञान विषयाचे अध्यापन पराते सरांनी केले तर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी कल्पना मोहोड मॅडम यांनी भाषा विषय शिकविला.

या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी डॉ. नसीरुद्दीन अन्सार सर आणि उर्दू शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष जव्वाद हुसेन सर यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून प्रकाशवाट प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक केले.

आज प्रकाशवाट प्रकल्पाचे सदस्य अभिजीत देशमुख सर पोही यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता व जिलब्यांचे वाटप करण्यात आले.

दुपारी ३ वाजता गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आणि संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत हजारी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व गणवेशांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा. हरिष मारोती आप्पा पिंपळे, सचिव लछवानी, सदस्य संतोष भांडे पाटील, योगेश फुरसुले, दायमा भाऊ, पालकगण आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाशवाट प्रकल्पाला सेवा देणारे मार्गदर्शक आश्विन बागडे सर, पवन बोळे सर व अभिजीत देशमुख सर यांचा आमदार पिंपळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

“ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. अशा उपक्रमांना गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पूर्ण सहकार्य राहील,” असे आमदार पिंपळे यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व डोळ्यांची नेत्रतपासणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रशांत हजारी हे बुलडाणा येथील हिवरा आश्रमच्या माध्यमातूनही गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणसुविधा पुरविण्याचे कार्य करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाशवाट प्रकल्प टीम, मुर्तिजापूर व नागपूर यांचे विशेष योगदान राहिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!