Join WhatsApp group

गाड्यांमधील चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत – अकोला GRP कार्य प्रणालीवर प्रश्न चिह्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला: दिनांक ०७ जुलै २५ : अकोला रेल्वे स्थानक व गाड्यांमधील चोरीच्या घटनांनी उग्र स्वरूप धारण केले असून, जीआरपी पोलिस या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. दोन दिवसांत चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल ४४ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्थानक परिसरात व ट्रेनमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू सहजतेने चोरीला जात आहेत. काही घटनांमध्ये तर गुन्हेगारांनी निर्घृण हत्या देखील केली असूनही, जीआरपी पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.

५ जुलै रोजीच्या घटनेत, मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी संजय रामप्रसाद सावळे (वय ५१) हे अकोला स्टेशनवर रात्री तिकीट बुकिंग काउंटरजवळ झोपले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.

त्याच दिवशी अकोट तालुक्यातील रुईखेड येथील संजय देविदास शेंडे (वय ४८) हे अकोला ते अकोट प्रवास करत होते. उगवा स्टेशनवर दाराजवळ उभे असताना, अज्ञात व्यक्तीने ११ हजारांचा मोबाईल त्यांच्या खिशातून चोरला.

रेल्वे स्थानकावरील आणि गाड्यांतील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अकोला जीआरपी पोलिसांना अद्याप आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. दरम्यान, जीआरपी अधिकारी फक्त जुने रेकॉर्ड दाखवत बचावाची भूमिका घेत असल्याची माहिती पीडितांनी दिली आहे.

या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलीस अधीक्षकांनी या घटनांची गंभीर दखल घेत अकोला स्थानक परिसरात सुरक्षा वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे वापरावी, गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!