Join WhatsApp group

भक्तीरसात न्हालेली पालखी : परभणी जिल्ह्यात संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे भक्तिपूर्ण स्वागतआमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन व सत्कार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट येथून भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात प्रारंभ झालेला श्री संत वासुदेव महाराज (उपाख्य श्रीज्ञानेश्वरदास) पालखी सोहळा अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे प्रस्थान करत पावन परभणी जिल्ह्यात अत्यंत तेजोमय व भक्तिपूर्ण वातावरणात दाखल झाला. टाळ, मृदुंग, वीणेच्या निनादात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात परभणीच्या भूमीत या पालखीचे दैवी स्वागत करण्यात आले.

पालखीचे स्वागत म्हणजे भक्तीचा उत्सव :

परभणी शहरात या दिंडीचे आगमन होताच संपूर्ण वातावरणात भक्तीचा झंकार भरून राहिला. शहर स्वागत समितीच्या पुढाकाराने विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या लयीत, अभंगाच्या सुरात, आणि पुष्पवृष्टीने पारंपरिक शैलीत वारीचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार मा. राजेश विटेकर यांनी स्वतः पालखीसमोर उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले, पूजन केले, आणि संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

सेवा म्हणजेच खरे भक्तिमार्ग :

वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाविकांनी पुढाकार घेतला. वाटसरूंना चहा, सरबत, फराळ, अन्नदान आणि निवासाच्या व्यवस्था मोठ्या श्रद्धेने करण्यात आल्या. पावसाळ्याचा विचार करून रेनकोट, छत्र्या, धोतरांचे वाटप देखील करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. गोपाळराव काळे यांच्यासारखे सेवाभावी डॉक्टरही पालखी सोबत पायी वारी करीत आहेत.

पालखीत कीर्तन, भजन, वादनाचा अखंड झंकार :

या वारीत सहभागी झालेल्यांमध्ये नामवंत कीर्तनकार, भजनकार, गायक, वादक, तसेच ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले, उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे, विश्वस्त गजानन पाटील दुधाट, व्यवस्थापक ह.भ.प. अंबादास महाराज मानकर, समाजसेवक गजानन हरणे, गायक पवन काळेमेघ, महादेव धनोकार, हरीश खंडारे, संदीप उदाळ, संतोष सहारे, सागर परिहार, तसेच वादक कार्तिक रोकडे, ज्ञानेश्वर डांगटे, राम शिंगणे, ऋषिकेश सोनवणे, अर्पित दुधाड, विष्णू गावंडे, आणि विणेकरी ह.भ.प. तेजराव मसाये यांचा सक्रिय सहभाग आहे.

पंढरपूर वारीस राजमान्यता :

विदर्भाचा गौरव
या वर्षी श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी करणाऱ्या श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून राजमान्यता प्राप्त झाली असून, यामुळे संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण आहे. शासनातर्फे रस्त्यालगत शासकीय आरोग्य सेवा व पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येत असून, विदर्भातील फक्त तीन पालख्यांना मिळालेल्या राजमान्यतेपैकी ही एक पालखी आहे, हे विशेष महत्त्वाचे ठरते.

ज्ञानपीठ संस्थेचे सुयोग्य आयोजन :

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले, उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे आणि व्यवस्थापक अंबादास महाराज मानकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी चहा, जेवण, थंड पाणी सेवा, वैद्यकीय सेवा, साऊंड रथ, महाराजांचा रथ, ट्रक व वाहतूक सेवा अशा सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कुशलतेने संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. बाळकृष्ण वाकोडे हे आर्थिक हिशोब ठेवत आहेत. सम्राट कोरडे यांची सामान वाहतूक सेवा उल्लेखनीय आहे.

पालखीचा प्रत्येक पावलावर भक्तीचा आविष्कार :

सुमारे ३०० वारकरी – पुरुष, महिला, बालवैष्णव या वारीत सहभागी असून, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. मार्गावर असंख्य भक्तगण टाळ, मृदुंग व वीणेच्या सुरात या वारीला नतमस्तक होत आहेत.

वारी म्हणजे सजीव अध्यात्मिक विद्यापीठ :

वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती संस्कार, समरसता आणि श्रद्धेचा सजीव प्रवाह आहे. ही परंपरा जपणे, वाढवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
संत वासुदेव महाराज यांची पालखी ही सेवा, साधना आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक ठरत असून, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक अमोल ठेवा आहे.

‘पंढरीच्या विठोबाचे दर्शन’ – हेच अंतिम लक्ष्य :

वारकऱ्यांच्या मनात विठोबाच्या चरणी पोहोचण्याची अनावर ओढ असून, सर्व अडथळ्यांवर मात करत ही पालखी पंढरपूरकडे पावले टाकत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!