Join WhatsApp group

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार – मंत्री प्रकाश आबिटकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती बैठकीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर दि.21 (जिमाका): लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोल्हापूर माहिती विभागात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची दोन दिवसीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. गणेश मुळे, संचालक किशोर गांगुर्डे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके तसेच राज्य समितीचे सदस्य व विभागीय समितीचे अध्यक्ष तसेच उपसंचालक उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचा शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे कोल्हापूर पद्धतीने फेटा बांधून पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आपल्या लेखणीद्वारे भविष्याचा वेध घेण्याचे काम पत्रकार करतात. राज्यात अधिस्वीकृतीपत्रिका मिळणाऱ्या पत्रकारांची संख्या अत्यंत कमी असून ही संख्या वाढायला हवी. त्याचबरोबर समाजातील वस्तुस्थिती परखडपणे पण योग्य पद्धतीने मांडून समाजाला जागृत करुन योग्य दिशा देणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज असून असे प्रगल्भ पत्रकार तयार होणे आवश्यक आहे, असे सांगून मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित सकारात्मक निर्णय घेतील. मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील पत्रकारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व पत्रकारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्यमंत्री, अशी ओळख निर्माण करावी – यदु जोशी

समितीचे अध्यक्ष यदु जोशी म्हणाले, कोल्हापूर हा दिलदार व्यक्तींचा जिल्हा आहे. दिलदार जिल्ह्यातील आरोग्यमंत्री असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावून पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्यमंत्री अशी ओळख निर्माण करावी.

राज्याच्या विविध जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठका होतात. पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याचे काम ही समिती करत असून आतापर्यंत सुमारे 3200 पत्रकारांना समितीने अधिस्वीकृती पत्रिका वितरीत केल्या आहेत. मध्य प्रदेश शासनाच्या वतीने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे अभ्यास दौऱ्यात दिसून आले. अल्प वेतन, तुटपुंजी पेन्शन, उदरनिर्वाहासह सुरक्षेचा प्रश्नही पत्रकारांसमोर आहे. शाहू, फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या निर्मितीत पत्रकारांचा मोठा वाटा असून समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करुन पत्रकारांना सन्मान मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अध्यक्ष यदू जोशी यांनी समाधान व्यक्त करुन सर्व सदस्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!