Join WhatsApp group

Ads

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळीचाही समावेश

By Sarkarmzanews

September 27, 2026 10:07 am

Ads

‘ट्रिगर-१’ लागू असलेल्या तालुक्यांसाठी विविध सवलतींची घोषणा; पीक नुकसानीची मदत पंचनाम्यानंतर स्वतंत्र निर्णयाने

मुंबई, दि. २६ : राज्यातील पावसाची तूट, पावसातील दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेता, खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांचा या निर्णयात समावेश आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शीटाकळी या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक हातातून जाताना पाहणे अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे केवळ दुष्काळ जाहीर करून थांबायचे नाही, तर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या सवलती?

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात सूट आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करण्यासाठी निकषांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा, टंचाईग्रस्त गावांमध्ये कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने

पीक नुकसानीबाबत प्रत्यक्ष आर्थिक मदत मात्र विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला पीक नुकसानीचे अचूक व पारदर्शक पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पीक कापणी प्रयोग, पीकस्थितीचे छायाचित्रण आणि GPS नोंदणी तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

यामुळे प्रत्यक्ष नुकसान किती झाले, याची नोंद अधिक अचूकपणे होण्याची अपेक्षा आहे.

अमरावती विभागातील ५६ तालुके दुष्काळग्रस्त

महसूल विभागनिहाय विचार करता ठाणे विभागातील १२, नाशिक विभागातील ४९, पुणे विभागातील ३५, छत्रपती संभाजीनगर विभागातील ७४, अमरावती विभागातील ५६ आणि नागपूर विभागातील ३९ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरसह सातही तालुक्यांचा समावेश झाल्याने गेल्या काही आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्ष पीक नुकसानभरपाई किती आणि कधी मिळणार, हा प्रश्न आता पंचनामे व स्वतंत्र शासन निर्णयाकडे लागून राहणार आहे.

मुर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!