Join WhatsApp group

Ads

ठेवीदारांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या गजानन नगरी पतसंस्था घोटाळ्यातील 2 मुख्य आरोपी अटकेत

By Sarkar Maza

May 29, 2026 10:03 am

Ads

अकोला : शहरातील गजानन नागरी पतसंस्था, डाबकी रोड येथील तब्बल ₹१६.७९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन मुख्य आरोपींवर शिकंजा आवळला आहे. ठेवीदारांचा विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक स्मिता प्रल्हाद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन नागरी पतसंस्था, डाबकी रोड, अकोला येथे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेव रक्कम स्वीकारण्यात आली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनही ठेवीदारांना त्यांची ठेव रक्कम परत करण्यात आली नाही. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे अप. क्र. ३२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३(५) तसेच महाराष्ट्र संरक्षण हित संबंधी अधिनियम (MPID Act) १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ यांनी संगनमताने ठेवीदारांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकिशोर नारायण अवारे (वय ५७), व्यवसाय व्यवस्थापक, रा. गजानन नगर गल्ली क्र. २, डाबकी रोड, अकोला यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मा. न्यायालयाने आरोपीस दि. ०३ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरा आरोपी नारायण काशिराम अवारे याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानुसार प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विशेष म्हणजे, या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सन २०२२ पासून सुरू होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत घोटाळ्याचे गंभीर स्वरूप समोर आले. आतापर्यंत १८२ गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जुमळे व त्यांच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!