Join WhatsApp group

Ads

खारघरमध्ये भीषण अपघात; भरधाव डंपरखाली चिरडून वकिलाचा जागीच मृत्यू*

By Sarkar Maza

May 5, 2026 7:22 pm

Ads

पनवेल प्रतिनिधी (श्रीनाथ दत्तात्रेय लाड) – पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे भरधाव डंपरने दुचाकीस्वार तरुण वकिलाला चाकाखाली चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली.

या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको करत आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काही तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावाची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.सीबीडी बेलापूरकडून सेंट्रल पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. 28 वर्षीय महेश अशोक लोहार असे मृत वकिलाचे नाव असून, ते खारघरच्या सेक्टर 12 परिसरात राहत होते. सोमवारी सायंकाळी ते आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात असताना राडारोडा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना डंपरच्या मागील चाकाखाली चिरडले.

या भीषण अपघातात महेश यांच्या अंगावरून डंपर गेल्याने ते जागीच ठार झाले तर डंपरच्या धडकेत त्यांचा मित्र उडवला गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मृताच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी घटनास्थळी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. काही वेळातच त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत रास्तारोको सुरू केला. यामुळे खारघरमधील उत्सव चौक ते अग्निशमन दलापर्यंत वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढत योग्य कारवाईचे आश्वासन दिले. अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली. पोलिसांनी या घटनेनंतर डंपरचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!