Join WhatsApp group

Ads

---

अकोला पोलीस दलातर्फे सन २०२४–२०२५ पोलीस भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण

By Sarkarmzanews

February 10, 2026 8:43 am

Ads

अकोला : अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत सन २०२४–२०२५ या कालावधीतील पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून, ही भरती प्रक्रिया दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता पोलीस मुख्यालय, अकोला येथे सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेत १६१ पोलीस शिपाई पदांसाठी एकूण ११ हजार ७८४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले असून, ही प्रक्रिया पोलीस मुख्यालय तसेच वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे पार पडणार आहे. पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यात आले होते. सेवाप्रवेश नियम, शासन निर्णय व परिपत्रकांची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ही भरती प्रक्रिया पारदर्शक, सुलभ व सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी गृह विभागाच्या दिनांक १६ जून २०११ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी सुविधा व सुरक्षा उपाययोजना उमेदवारांच्या सोयीसाठी भरती स्थळी सूचनाफलक, पी.ए. सिस्टम, फिरती स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, उपहारगृह तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांची ओळख अर्जावरील फोटो, आधारकार्ड (असल्यास), चालक परवाना किंवा शैक्षणिक ओळखपत्राच्या आधारे पटविण्यात येणार आहे. त्यानंतर डिजिटल फोटो व बायोमेट्रिक पडताळणीनंतरच शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येईल.

कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आधुनिक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यरत राहणार असून गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शारीरिक मोजमाप व चाचणीतील निर्णयाबाबत उमेदवारांना दोन वेळा अपील करण्याची संधी देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व चित्रीकरणासह पार पडणार आहे.

उंची व छाती मोजण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे वैधमापन शास्त्र विभागामार्फत प्रमाणित करण्यात आली असून मैदानी चाचणी ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही व व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होणार आहे. १६०० मीटर, ८०० मीटर व १०० मीटर धावण्याच्या चाचण्यांदरम्यान पाणीपुरवठा, वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे.

गैरप्रकारांना आळा

भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अंगझडती घेतली जाईल. स्टेरॉईड किंवा अन्य उत्तेजक पदार्थ आढळल्यास वैद्यकीय तपासणीनंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उमेदवारांना सामान्य स्पोर्ट्स शूज वापरण्याची परवानगी असून विशेष प्रकारचे शूज वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी आधारकार्ड, सहा पासपोर्ट साईज फोटो, बारावी गुणपत्रिका किंवा बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला/एसएससी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर, ईडब्ल्यूएस, एसईबीसी (लागू असल्यास) तसेच इतर कौशल्य प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. समांतर आरक्षणातील उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे अनिवार्यपणे सादर करावीत. सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व दोन झेरॉक्स प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे. सर्व प्रमाणपत्रे दिनांक ७ डिसेंबर २०२५ पूर्वीची असणे आवश्यक आहे.

बंदोबस्त व निवास व्यवस्था

भरती प्रक्रियेसाठी ६ वरिष्ठ पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक, ३० उपनिरीक्षक, ३०० पोलीस अंमलदार तसेच ५० मंत्रालयीन कर्मचारी तैनात राहणार आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी निमवाडी पोलीस वसाहत, अकोला येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!